Thursday, July 21, 2011

प्रेमाचा Ringtone !!


प्रेमाचा Ringtone !!

माझ्या आठवणींनी तुझं हृदय
व्हायब्रेट होत राहू दे
तुझ्या हृदयात माझ्या प्रेमाचा
रिंगटोन वाजत राहू दे!

दूर सखे माझ्यापासून
गेलीस तरी चालेल
बरेच दिवस मला तू
भेटली नाहीस तरी चालेल
पण जाशील तिथे माझ्या आठवणींचं
नेटवर्क कव्हरेज असू दे!
तुझ्या हृदयात माझ्या प्रेमाचा
रिंगटोन वाजत राहू दे!

अन सखे एकटीच तू
निजशीलही कधी कधी
मी नसलेली उजाड स्वप्नं
बघशीलही कधी कधी
पण पापण्या उघडताच तुझ्या डोळ्यांत,
माझाच मिस्ड कॉल दिसू दे!
तुझ्या हृदयात माझ्या प्रेमाचा
रिंगटोन वाजत राहू दे!

दूर दूर राहून असं
थकुन जाशील तू सखे
वणवण सारी सारी करून
विझून जाशील तू सखे
अशावेळी मला भेटून
तुझी बटरी रीचार्ज होऊ दे!
तुझ्या हृदयात माझ्या प्रेमाचा
रिंगटोन वाजत राहू दे!

जमेल तसं प्रेम आपलं
कॉप अप करता यायला हवं
झीरो बलन्स झाला तरी
मोकळं बोलता यायला हवं
मोकळं बोलून, कॉप अप करून
प्रेम 'मोबाईल' राहू दे!
तुझ्या हृदयात माझ्या प्रेमाचा
रिंगटोन वाजत राहू दे!


पाऊस फिरकला नाही, नुसतेच ढगाळून गेले


डोळ्यात चार थेंबांचे
आभाळ तरारुन गेले
पाऊस फिरकला नाही,
नुसतेच ढगाळून गेले
दाटून आले तेंव्हा मी
रोवून पाय बसलोही
देहात जरा रुजण्याचे
आभास थरारुन गेले
गोंगाट कुठे मेघांचे,
थैमान कुठे वार्‍याचे
अन जरा थरकता वीज,
अस्तित्व लकाकून गेले
येईल अता वेगाने,
भिजवेल मला प्रेमाने
गात्रांत नव्या स्वप्नांचे
आभाळ फुलारुन गेले
मज किती वाटले तरिही,
मी किती थांबलो तरीही
पाऊस फिरकला नाही...
नुसतेच ढगाळून गेले...

Wednesday, July 13, 2011


सगळेच प्राणी लग्न करतात...


माकडं असोत वा गाढवं असोत
सगळेच प्राणी लग्न करतात
माणसं असोत वा सिंह असोत
बहुतेक नवरे लाथाच खातात !!



गाढवीण आपल्या गाढवाला
'ऑफिशियली' लाथा मारते
माकडीण आपल्या माकडाला
हवं तसं 'टांगून' ठेवते
सिंहीण आपल्या सिंहराजाची
पाहिजे तेंव्हा आयाळ खेचते
अन बाई माणूस, बुवा माणसाचा
फक्त बोलून खीमा करते !
मार्ग त्यांचे काहीही असोत
उद्दिष्टं त्यांची एकच असतात
म्हणून
माणसं असोत वा सिंह असोत
बहुतेक नवरे लाथाच खातात !!


गाढव नवर्‍याला गाढविणीवरती
गुरकताना पाहिलंय कधी?
सिंहिणीला ताटाखालचं
मांजर झालेलं पाहिलंय कधी?
आपण पहातो माकडला
माकडचेष्टा करताना
अन बुवा माणसाला, बाईमाणसाच्या
मुठीत निमूट जगताना
जात त्यांची काहीही असो
अनुभव नवर्‍यांचे सारखेच असतात
कारण
माणसं असोत वा सिंह असोत
बहुतेक नवरे लाथाच खातात !!


गाढवासारखं 'हो' 'हो' म्हणत
नवरे आपले जगत रहातात
माकडासारखं आशांवरती
नवरे नेहमी लटकत रहातात
सिंह बनून जगण्यासाठी
हिंमत त्यांच्यात उरत नाही
माणूस म्हणून जगण्यासाठी
किंमत त्यांना उरत नाही
आलेला दिवस, आलेले क्षण
पुढे पुढे ढकलत रहातात
कारण
माणसं असोत वा सिंह असोत
बहुतेक नवरे लाथाच खातात !!

;;