Monday, June 13, 2011


नाते तुझे नि माझे यावे कसे जुळून?

नाते तुझे नि माझे यावे कसे जुळून?
तू सावली सुखांची, मी सैरभैर ऊन..

तू नेहमी सुखांशी केला करार राणी
मी नेहमी सुखांची झालो शिकार राणी
आहे सदैव याची जाणीव पांघरून
तू सावली सुखांची, मी सैरभैर ऊन..

फिरलो किती कितीशी अज्ञात अंतराळे
जपले किती कितीसे अश्राप पावसाळे
जाते क्षणात सारे वार्‍यावरी विरून
तू सावली सुखांची, मी सैरभैर ऊन..

देऊन हूल आता या ऊन सावल्यांना
जाऊ निघून राणी आपापल्या दिशांना
हृदयातले उधाण जाईल ओसरून
तू सावली सुखांची, मी सैरभैर ऊन...

नाते तुझे नि माझे यावे कसे जुळून?
तू सावली सुखांची, मी सैरभैर ऊन...

0 Comments:

Post a Comment