Tuesday, August 16, 2011


पंधरा ऑगस्ट हा एक उत्सवच असतो..

पंधरा ऑगस्ट हा एक उत्सवच असतो
वेगवेगळ्या वाहिन्यांमधून भळभळणाऱ्या
बाजारू देशभक्तिपटांचा
आणि
चौकाचौकात निमूटपणे उभ्या असलेल्या
तिरंग्यांना
कर्कश्श गाणी ऐकवणाऱ्या
उन्मत्त ध्वनिवर्धकांचा...

पंधरा ऑगस्ट हा एक उत्सवच असतो
सिग्नलला उभ्या असलेल्या गाड्यांना
चढाओढीनं कागदी तिरंगे विकणाऱ्या
भविष्यहीन कोवळ्या मळकट हातांचा आणि
एकेकाळी आयुष्य झोकून देऊन केलेल्या
संग्रामाच्या आठवणींना दूर सारून
आयुष्यावर पसरलेल्या उद्विग्नतेनी
थरथरणाऱ्या कापऱ्या वयोवृध्द हातांचा...

पंधरा ऑगस्ट हा एक उत्सवच असतो
सरकारनं 'जन्ते'वर लादलेल्या ड्राय डे चा
आणि या ड्राय डे ला झुगारून
नशोन्मत्त वर्षासहलींमधे चिंब भिजून
ओसंडून वहाणाऱ्या
दिशाहीन बेहोष तरूणाईचा...

अर्थात...
पंधरा ऑगस्ट हा असाही एक उत्सव असतो
एक अब्जापैकी मुठभर हृदयांमधे
सदोदित धडधडणाऱ्या 'जन गण मन' चा
आणि स्वच्छ धुतल्या गणवेशावर
तिरंगी बिल्ला लावून
उत्साहादरानं बागडत शाळेत जाऊन
मनोभावे 'भारत माता की जय' म्हणणाऱ्या
कोवळ्या निरागस शैशवाचा...

याच मुठभर हृदयांमुळे
आणि याच ऊर्जामय शैशवामुळे
हा उत्सव आपण 'स्वातंत्र्यात' साजरा करत राहू शकू
हीच आशा...

Monday, August 15, 2011

बापुजींची ईमेल...


बापुजींची ईमेल...

पंधरा ऑगस्टला ईमेल्स बघण्याची
कुठून कळेना बुध्दी झाली...
माझ्या इनबॉक्स मधे आज
बापुजींची ईमेल आली!

Sender चं नाव ओळखीचं नव्हतं
वाटलं, कदाचित spam असेल...
नंतर वाटलं, बापुजींच्या नावानी
कशाला कोण Spamming करेल!

बापुजींनी लिहिलं होतं...

बेटा, साठ वर्षातली तुमची प्रगती पाहून
मला फार फार आनंद झालाय...
आत्ताच मी पाहिलं,
ऑर्कुटवरच्या हजारो प्रोफाईलस वर
आज माझा तिरंगा झळकलाय!

तुमचं अपार देशप्रेम पाहून
ऊर माझा दाटून येतो...
पंधरा ऑगस्टला SMS च्या पुरात
देश सगळा बुडून जातो!

तुझ्याही इनबॉक्स मध्ये आज
शेकडो forwards आली असतील
स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देणारी
E-Greetings सुध्दा भरपूर असतील...

तुझे SMS, Emails, Scrapping झाल्यावर
माझं एक छोटंसं काम करशील?
एक चरख्याचं चित्र मी Attach केलंय
तेही तुझ्या मित्रांना Forward करशील... ?

आणि हो...
तुझ्या १० मित्रांना १० मिनिटात हे Forward केलं नाहीस
तरी फरक काहीच पडणार नाही....
कारण चरख्यावाचून या देशाचं
आता कधीच काही अडणार नाही...
आणि बापुजींवाचूनही तुमच्या कोणाचं
आता कधीच काही अडणार नाही...

Saturday, August 13, 2011


सगळ्या प्रेमकथांची अखेर...

सगळ्या प्रेमकथांची सुरुवात
गोड बोलण्यानंच होते
सगळ्या प्रेमकथांची अखेर
मटार सोलण्यानंच होते!

प्रेमात दोघं असतात तेंव्हा
सगळं गुलाबी वाटत असतं
एकमेकांना प्रेमानं दिलेलं
पाणीही शराबी वाटत असतं
प्रेमकथांची सुरुवात अशीच
पाण्यानंही झिंगून जाण्यानं होते
प्रेमकथांची अखेर मात्र
(तळमजल्यावरून) बादल्या भरून आणण्यानं होते!

प्रेमाचा डाव रंगतो तेंव्हा
'हात' एकमेकांसाठी धरले असतात
दोघंजणं एकमेकांसाठी
राजा-राणी बनले असतात
प्रेमकथांची सुरुवात अशीच
एकमेकांसाठी 'हात' धरण्यानं होते
प्रेमकथांची अखेर मात्र
एकमेकांना झब्बू देण्यानं होते!

प्रेमामधे एकमेकांबद्दल
जे जे काही कळलं असतं
संसारात त्याच गोष्टींवरून
एकमेकांना छळलं जातं
प्रेमकथांची सुरुवात अशीच
कळूनही न कळण्यानं होते
प्रेमकथांची अखेर मात्र
छळून छळून छळण्यानं होते!

एकमेकांच्या वागण्यामधे
आपल्याला फक्त चुका दिसतात
एकमेकांच्या शब्दांमधे
चाबूक आणि बंदुका दिसतात
जे जे होणार नाही वाटतं
ते ते सारं घडत जातं
प्रेमकथेच्या शेवटी शेवटी
सारं सारं बिघडत जातं!

(हे असलं तरी आपण काय करुया)

असंच जरी होत असलं
असं आता होणार नाही
तुझ्या माझ्या कथेला राणी
शेवट अता असणार नाही

तुझ्या माझ्या श्वासांमधे
रोज मोगरा गंध भरेल
मावळणाऱ्या दिवसासोबत
हृदयामध्ये चंद्र उरेल

रोजचा सूर्य आपल्यासाठी
नवी कथा घेऊन येईल
तुझी माझी प्रेमकथा
रोज नव्यानं सुरू होईल
तुझी माझी प्रेमकथा
रोज नव्यानं सुरू होईल

;;